समेतेच्या विचारांची जाणीव आणि स्वतःला प्रश्न विचारण्यासाठी "लोक-शास्त्र सावित्री" हे नाटक प्रत्येकाने एकदा अवश्य पाहावं ! - पुजा भालेराव पुणे
समेतेच्या विचारांची जाणीव आणि स्वतःला प्रश्न विचारण्यासाठी "लोक-शास्त्र सावित्री" हे नाटक प्रत्येकाने एकदा अवश्य पाहावं !
- पुजा भालेराव, पुणे
मी नुकतंच "लोक- शास्त्र सावित्री" हे नाटक पाहिलं आणि अजूनही त्यातला काही संवाद मनात सतत घुमत आहेत. विशेषतः एक वाक्य "करोडो महिला शिकल्या, पण एकही सावित्री नाही झाली" इतकं खोलवर पोहोचलं की मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. मी स्वतः एक पीएच.डी. धारक आहे, उच्चशिक्षित आहे, पण खरंच सावित्रीबाई फुले यांनी ज्या मूल्यांसाठी, ज्या ध्येयासाठी लढा दिला, त्या मार्गावर मी चालतेय का? शिक्षण केवळ पदवी मिळवण्यासाठी नाही, तर ते समाज परिवर्तनासाठी असावं ही त्यांची शिकवण आहे, आणि हे नाटक त्या विचारांना जागं करतं. नाटकाची संहिता अतिशय प्रभावी होती. प्रत्येक प्रसंग ठळकपणे लक्षात राहतो. कलाकारांचा अभिनय जबरदस्त होता, एकेका भूमिकेत त्यांनी जीव ओतलेला स्पष्ट दिसत होता.
सादरीकरण,प्रकाशयोजना, संगीत सगळं काही समरसून तयार केलं गेलं आहे. संपूर्ण टीमचा मेहनतीचा आणि समर्पणाचा प्रत्यय येतो. ही केवळ नाट्यकृती नाही, तर एक सामाजिक संदेश घेऊन येणारी चळवळ वाटली. "लोक-शास्त्र सावित्री" हे नाटक प्रत्येकाने एकदा तरी पाहावं. केवळ इतिहास जाणून घेण्यासाठी नाही, तर स्वतःच्या विचारांची जाणीव करून देण्यासाठी, स्वतःला प्रश्न विचारण्यासाठी. सावित्रीबाईंनी दाखवलेला प्रकाश आपल्या आयुष्यात आहे का, याचा शोध घेण्यासाठी हे नाटक एक आरसा बनून समोर येतं.

Comments
Post a Comment